माझ्या आठवणीतले बस स्टॉप
"माझ्या आठवणीतले बस स्टॉप” रोजच्या धकाधकीच्या जीवनातील वळणावर किती लोकं भेटतात ना नकळत आपल्याला, जी त्यांची कैफियत नकळत सांगून जातात? किती तन्मयतेने तुम्ही त्यांच्या व्यथा ऐकून घेता यावर तुमची निरीक्षण क्षमता बऱ्याच अंशी अवलंबून असते असे निदान मला तरी वाटते. बस स्टॉप सर्वांनीं बघितलेलाच असेल ना? एखादा खूप गर्दीचा बस स्टॉप, असंख्य लोकं आपल्या आपल्या विवंचनेत आपल्या बसची वाट बघत आपल्या विश्वात गुंग झालेली दिसतात. लहान मुलं मात्र सर्व भान विसरून तिथे सुद्धा मस्त खेळत असतात, त्यांना कसलीच चिंता नसते. कदाचित वाढत्या वयाबरोबर चेहेऱ्यावरचे हसू उडायला लागते कि काय असा भास होतो. एखादा वृद्ध व्यक्ती आपला जाड भिंगांचा चष्मा आणि काडी सांभाळत आडोशाला बसलेला दिसतो, एखादे गोंडस बाळ मस्त चॉकलेट खाताना स्वतःशीच बडबडत असते. अचानक कँटीन मधून गरम खमंग नाश्त्याचा ट्रे घेऊन मोठ्या दिमाखाने एखादा कारागीर येतो आणि त्याच्या सुगंधाने प्रवाश्यांना जणू भुरळ पाडून आपली कमाई करून घेतो. अश्या परिस्थितीमध्ये सुद्धा तुम्हाला काही हतबल चेहेरे दिसतील जे मनातल्या मनात त्या गरम नाष्ट्याकडे बघूनच तृप्त होऊन जातात. होत...