माझ्या आठवणीतले बस स्टॉप

"माझ्या आठवणीतले बस स्टॉप”

रोजच्या धकाधकीच्या जीवनातील वळणावर किती लोकं भेटतात ना नकळत आपल्याला, जी त्यांची कैफियत नकळत सांगून जातात? किती तन्मयतेने तुम्ही त्यांच्या व्यथा ऐकून घेता यावर तुमची निरीक्षण क्षमता बऱ्याच अंशी अवलंबून असते असे निदान मला तरी वाटते. बस स्टॉप सर्वांनीं बघितलेलाच असेल ना? एखादा खूप गर्दीचा बस स्टॉप, असंख्य लोकं आपल्या आपल्या विवंचनेत आपल्या बसची वाट बघत आपल्या विश्वात गुंग झालेली दिसतात. लहान मुलं मात्र सर्व भान विसरून तिथे सुद्धा मस्त खेळत असतात, त्यांना कसलीच चिंता नसते. कदाचित वाढत्या वयाबरोबर चेहेऱ्यावरचे हसू उडायला लागते कि काय असा भास होतो. एखादा वृद्ध व्यक्ती आपला जाड भिंगांचा चष्मा आणि काडी सांभाळत आडोशाला बसलेला दिसतो, एखादे गोंडस बाळ मस्त चॉकलेट खाताना स्वतःशीच बडबडत असते. अचानक कँटीन मधून गरम खमंग नाश्त्याचा ट्रे घेऊन मोठ्या दिमाखाने एखादा कारागीर येतो आणि त्याच्या सुगंधाने प्रवाश्यांना जणू भुरळ पाडून आपली कमाई करून घेतो. अश्या परिस्थितीमध्ये सुद्धा तुम्हाला काही हतबल चेहेरे दिसतील जे मनातल्या मनात त्या गरम नाष्ट्याकडे बघूनच तृप्त होऊन जातात. होतं ना असं बऱ्याचदा ? कोणी कुटुंबासोबत लहान मुलाबाळांमध्ये व्यस्त असतो, कोणी आपल्या मित्र मैत्रिणींमध्ये गप्पा हाणत असतो, कोणी एकटाच कोपऱ्यात बसून आकाशाकडे आणि येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाकडे एखाद्या CID सारख्या नजरेने कटाक्ष टाकत बिडी सिगारेट चे झुरके घेण्यात एकदम व्यस्त असतो आणि मध्येच लहान मुले, भिकारी, गरीब लोकं काही तरी खायचे मिळेल म्हणून जिवाच्या आकांताने कोणाची तरी विनवणी करताना दिसतात. तर कधी कोणी एखाद्याशी भांडणात आणि शिव्या देण्यात व्यस्त असतो. चौकशी खिडकीतल्या त्या त्रस्त माणसाच्या चेहेऱ्याकडे बघितले कि प्रत्येकाला वाटायला लागते ना कि बरे आहे बुवा आपण त्याच्या जागी नाही ते? आणखी बरेच काही मजेशीर दृश्य दिसत असतात ना? काही स्वतःशी बडबडताना दिसतील तर काही सर्व दुःख आपल्या चेहेऱ्यामागे लपवून आनंदी असल्याचा आव आणतील. एखाद्याला डुलकी लागलीच असते कि त्या भोंग्यावरून कर्कश्श आवाजात सूचना येते, 'अमुक गावाला जाणारी बस इतक्या वाजता सुटेल' आणि नाईलाजाने त्याला उठून बसमध्ये जागा मिळवण्यासाठी सज्ज व्हावे लागते. कधी एखादा कटाक्ष टाकून बघा त्यांच्याकडे. प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या व्याधी, चिंतेने ग्रासलेले असतेच, मग शारीरिक असो कि मानसिक असो, चेहेरे बघा, त्यावरचे रंग बरेच काही सांगून जातील. खूप मजा येते माणसांची चेहेरे वाचण्याची सवय लागली कि, म्हणजे आपली दुःखे पार विसरून जातो आपण अश्या निरीक्षणात. फक्त एखादा भिंग घेऊन कोणाच्या तोंडासमोर जाऊ नका चेहेरा वाचायला म्हणजे झाले. एखादा विरंगुळा म्हणून सहज प्रयोग करायला काय हरकत आहे हो? त्याला कुठे पैसे लागतात? कदाचित आपणही कोणाच्या तरी दृष्टीत असू शकतो ना, म्हणून थोडं भान ठेवूनच वागा म्हणजे झाले. बरं, मग पुढे काय? तुम्हाला प्रश्न पडला असेल कशाला आगाऊचे धंदे करायचे, हो ना, तर मित्रांनो हा छंद असला कि आपोआप माणसं ओळखायला आपण शिकून जातो काही अंशी. अश्याच छोट्या छोट्या गमतीजमती जमल्या कि एकटे असल्यावर कोणी कधीच स्वतःशी त्रस्त होत नाही. एक गोष्ट तुम्ही सुद्धा अनुभवली असेलच कि मग आपण त्या सर्व वातावरणात आपले ओळखीचे चेहेरे शोधायला सुरुवात करतो. प्रवास काय हो काही तासांचा असतो पण तिथे सुद्धा माणूस सहारा शोधतो, मग या आयुष्याच्या प्रवासाचे काय? मनुष्य हा सामाजिक प्राणी का असतो याचा साक्षात्कार होतो तो अश्याच गर्दीच्या ठिकाणी सापडलेल्या एखाद्या एकलकोंड्याला. म्हणून सोबती शोधा, मित्र शोधा. मन मोकळे, हलके करायला दुसरे मन शोधा म्हणजे बरेच सोपी होईल सर्व काही. नाहीच भेटले कोणी तर? मग तर अगदी सोप्प असतं कि आपणच आपले छानसे मित्र बनून जायचे. विषय असंख्य असतात, चिंता समाधान सापडेलच याची काही शाश्वती नसते, पण निदान आहे त्यात समाधानी जगायचे असेल तर मनाला समजून घेणे सर्वांत महत्वाचे असते. जो स्वतःला खूप चांगल्या प्रकारे ओळखून असतो ना त्याच्या साठी जगणं खूप छान असतं, नाही का? बरं असू द्या, मला सांगा प्रामाणिकपणे तुम्ही बघितले आहे का हो असे गजबजलेले बस स्टॉप?

- अमूल तांबोळी- (9763356722)

Comments

Popular posts from this blog

म्हणून म्हणतात- बाप तो बाप असतो..!

Ten years journey from a banker to an academician…

'How to produce creative content & find the right audience?'

I still remember that hoarding......

Soft Skills play crucial role in overall success of any business.

करूया सामना तणाव आणि नैराश्याचा!

‘Rural students & Communication skills’ are they really connected?

'मैत्रीदिन' विशेष-अमूल

"Rains always remind me, my memories with 'Pune' ..." - Amul S. Tamboli