A memory of my school
खरंच सर आज इतक्या वर्ष्यानी मला सुद्धा ते सर्व आठवलं आणि तुमच्या ह्या सुवर्ण आठवणींचा एक साक्षीदार म्हणून मी स्वतःला सुद्धा नशीबवान समजतो की मला अश्या गुरुवर्यांचा सहवास आणि मार्गदर्शन लाभले. सांस्कृतिक रजनी मधील तो राहिलेला एक प्रयोग शेवटी राहूनच गेला, कदाचित आठवत नसेलही तुम्हाला, एक भुताची गोष्ट नावाचं नाटक आपण करणार होतो पण ते झालेच नाही, असो. या अश्या अर्धवट आठवणीच खऱ्या अर्थाने बाकीच्या त्या दिवसांना अर्थ देत असतात. लाख मोलाचा वाटतो तो काळ, असे वाटते परत एकदा शाळा भरावी, परत फ़ूरसूल सरांच्या तासाला एखाद्या इंग्लिश ग्रामर च्या एका एकदम कठीण प्रश्नाचे उत्तर द्यावे (जो अख्ख्या क्लास मध्ये कोणालाच येत नसे) आणि गिफ्ट म्हणून त्यांकडून पेन परत मिळवावा. परत बोर्डे सरांकडून त्या लाल मातीच्या मैदानात बसून 'खरा तो एकाची धर्म जगाला प्रेम अर्पावे' हे गीत गावे, पुन्हा मिश्रीकोटकर मॅडम कडून फमु शिंदेंची 'आई' हि कविता शिकावी आणि अलगद डोळे पाणवावे, पुन्हा मुधोळकर सरांच्या तासाला भौतिकशाश्त्र शिकावे आणि आज काही तरी नवीन शिकायला मिळेल याची हमी वाटून घ्यावीशी वाटते, परत तुमच्या हातात चित्र कलेच्या तासाला रंगीत खडू बघून तर्क वितर्क लावायचे कि आज कोणते चित्र असेल फळ्यावर? इंगळे सरांकडून क आणि ड पातळीची कठीण भूमितीची गणिते सोडवणे आणि शाबासकी मिळवणे खूप मिस करतो मी. डोरले मॅडम आणि आंधळे सर इतिहास शिकवताना आम्हाला मंत्रमुग्ध करायचे, परत जीवशाश्त्र भिसीकर सरांकडून शिकायला आवडेल.. खूप काही अजून आहेत आठवणी या तर फक्त वरवरच्या काही होत्या... मला एका गोष्टीचा नेहेमी अभिमान वाटतो कि तुमच्या सारख्या सर्व अश्या दर्जेदार शिक्षकांमुळे आम्हाला जे शिक्षण मिळाले त्याची परतफेड कुठेच करता येणार नाही, समाधान एका गोष्टीचे आणखी वाटते कि ५ वी पासून थेट १० वी पर्यंत माझा वैयक्तिक वर्गात निकालात दुसरा क्रमांक कधीच चुकला नाही. तो शेवटचा क्षण आजही आठवतो मला जेव्हा आपल्या शाळेच्या परंपरेनुसार क्रमांक दोन ला स्पेशल बक्षीस देण्याचा गौरव मला प्राप्त झाला होता .. शेवटी मनात खंत एकाच राहील जी फक्त काही जवळचेच समजू शकतील कि गुणवंतांच्या फलकावर माझ्या दोन्ही भावांच्या नावाखाली माझे नाव मात्र ८८% मिळूनही २ मार्कंनी राहूनच गेले, पण जसे मी वरती सुद्धा लिहिले आपल्या सर्वांच्या आयुष्यातील खरी मज्जा या अश्या अर्धवट राहिलेल्या गमती जमती मुळे आणखीच वाढत असते. तेव्हा पुन्हा एकदा तुम्हा सर्व गुरुवर्याना साष्टांग दंडवत करून, खरंच एखादा तरी आपल्या शाळेच्या कार्यक्रमाला परत यावेसे वाटते, त्या वर्गांना परत बघावेसे वाटते, त्या टेबल खुर्च्यांना परत स्पर्श करून ते संपूर्ण जीवन जगावेसे वाटते, खरंच जे डी चवरे विद्यामंदिर तुला खूप खूप भेटावेसे वाटते- श्री. अमूल तांबोळी, शिरपूर, धुळे
Comments
Post a Comment