हरणार नाही, हरवणार अपयशाला!
हरणार नाही, हरवणार अपयशाला!
सर्वांच्या सर्व आशा, अपेक्षा, स्वप्नं जर का या जगात अगदी सहजतेने पूर्ण झाल्या असत्या तर खरंच काय झालं असतं? विचार केला का कधी. खरी मजा तर स्वप्नं मोडण्यात आहे, हाता तोंडाशी आलेला घास हरवून जाण्यात आहे, खूप प्रयत्न करूनही काही न मिळण्यात आहे, ते कसे? साहजिकच हा प्रश्न मनात येईल तुमच्या. तेव्हा विचार करा तुम्ही नुकतेच दोन पेले भरून छान पाणी पिले आहात, आणि कोणी तुम्हाला थंड बिसलेरी आणून दिली आणि आग्रह केला कि आताच संपवा, काय प्रतिक्रीया असेल तुमची? साधारणतः तुम्ही ती नाकारालच. आता दुसरी परिस्थिती जिथे दुपारचे दोन वाजले आहेत आणि तुम्ही उन्हात काही तरी काम करीत आहात आणि साधं पाणी सुद्धा पिलेले नाही बऱ्याच वेळापासून आणि खरंच आता जीव कासावीस होतोय पाण्यासाठी, तेवढ्यात तुम्हाला ती पहिले देऊ केलेली बिसलेरी आठवतेच ना? हो या वेळेस तुम्ही पूर्ण गटकुन जाणार यात तीळमात्र शंका नाही मला. आता फक्त पाण्याची तहान आपण आपल्या ध्येयाच्या, स्वप्नांच्या तहानेसारखी समजू आणि मग विचार करून बघा. ज्या ज्या संधी तुमच्या हातून निसटून गेलेल्या आहेत त्या सर्व एकच काम करीत असतात, ध्येय आत्मसाद करण्याची तहान वाढवण्याची, आले का लक्षात?
अपयश जितके जास्त तितकी तुमची ध्येयाप्रती आसक्ती वाढत जाणार. यश लगेच भेटले ना तर कदाचित एखादा माणूस समाधानी होऊन मोठी आणि अशक्य वाटणारी स्वप्ने पाहणे सुद्धा बंद करू शकतो कारण त्याची आशेची दारं बंद झालेली असतात. त्यामुळे जेव्हा तुमचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरतील, जेव्हा यश हुलकावणी देईल, जेव्हा स्वप्नं धुळीला मिळतील, तेव्हाच तुमच्या मनाला ‘नवीन आणि भव्यदिव्य’ यश आत्मसाद करण्याच्या भावनेची एक छानशी पालवी फुटेल. सर्व पुन्हा एकदा नियोजित करता येईल, ज्या पायऱ्या चुकलेल्या आहेत त्यांच्यावर आता नीट लक्ष पूर्वक एक कटाक्ष टाकता येऊ शकतो आणि योग्य मार्गदर्शन घेऊन कदाचित पहिल्यापेक्षा भव्य काहीतरी तुम्ही करून जाल.
तेव्हा आयुष्यात कधीही अपयशाला घाबरू नका, उलट ती एक संधी असते आपल्याला मिळालेली कि आपण सर्व काही परत ‘रीसेट’ करू शकतो. बघा, जो पर्यंत तुमची मनःस्थिती अशी आशावादी आणि सकारात्मक राहिला ना तो पर्यंत तुम्हाला या जगात कोणीही हरवू शकत नाही कारण ज्याच्या कडे आत्मविश्वास आणि सय्यम आहे ना तो आज नाही तर उद्या सर्व स्वप्ने खरी करतोच. जेव्हा मन मोडतं, स्वप्ने तुटतात किंवा कोणी तरी जाणूनबुजून तोडून जातात फक्त तो क्षण कठीण असतो सहन करण्यासाठी. जर त्या वेळी तुम्ही धैर्य दाखवले तर तुम्हाला कोणीही कधीही हरवू शकणार नाही, हे तितकेच खरे.
यशस्वी माणसं नक्कीच सांगतील काय केल्याने ध्येय गाठता येईल पण एखादवेळी अयशस्वी माणसाला सुद्धा भेटून बघा, तो कदाचित शंभर मार्ग सांगेल ज्यांना टाळून सुद्धा तुम्ही इच्छित ध्येयपूर्ती करू शकता. बघा निर्णय तुमचा आहे बस एकच करा, आपली स्वप्नं ज्या लोकांसाठी आहेत त्यांना या प्रवासात कधीही विसरू नका कारण यश कोणाचेही असो, स्वप्नं कोणाचेही असोत त्यात भावना या सर्वांच्याच गुंतलेल्या असतात ... अगदी कायम..
- अमूल तांबोळी
Comments
Post a Comment